एक भारलेली अभ्यासयात्रा
(पाटेश्वर, सातारा)
“ शिल्प सौंदर्याने नटलेले एक प्राचिन गूढ हिंदूलेणे किंवा मंदिर समूह ”
मागे एकदा पाटेश्वरला जाणे झाले पण देवालय परिसर पूर्ण पाहून झालाच नाही, कारण प्राचिन शिल्पं
पाहताना वेळ खूप कमी पडतो. खरे सांगायचे तर फोटो सुद्धा काढायला नको वाटते, कधी
कधी फोटो काढण्याच्या नादात आपण समोर दिसणारे शिल्प नकळतपणे दुर्लक्षित करीत असतो
असे वाटते आणि कालांतराने मग फोटोची आवश्यकता भासू लागते.
आता पाटेश्वर म्हणजे नक्की काय हे बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल सातारा
शहराच्या देगाव जवळील पर्वतरांगेत एकाकी पण “ शिल्प सौंदर्याने नटलेले एक प्राचिन गूढ
हिंदूलेणे किंवा मंदिर समूह ” बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.या पर्वत माथ्यावर
असणारे मुख्य पाटेश्वर शिवालय सोबत असणाऱ्या इतर मंदिरांच्या तुलनेत अलीकडच्या
काळातील म्हणजे अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात सातारच्या छ.शाहू महाराजांच्या
कारकिर्दीतील श्रीमंत परमेश्वर नारायण अनगळ यांनी बांधले असा उल्लेख आहे. मंदिर
हेमाडपंथी थाटणीचे असून त्याचे नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे भाग पडतात
व बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. पाहण्यासारखे खूप काही आहे पण लक्षवेधक आहे तो नंदी,
अप्रतिम कोरीव अलंकार, ठेवण पायाला वेटोळे घातलेले नाग व समोर शिवलिंगाची पूजा
करताना दोन स्त्री भक्त. सध्या त्यांची डागडूजी साध्या सिमेंटने केलीय... नव्हे
उरकलीए आणि त्या देखण्या शिल्पाच्या सौंदर्याला धक्का पोहोचलाय... असो, नाहीतरी
प्राचिन मंदिरांना रंगीबेरंगी ऑईल पेंट फासणारी आपली विचित्र सौंदर्य दृष्टीच आहे.
पार्किंग पासून चढणीला
सुरुवात करताना ध्यानीमनी नसताना दर्शन घडते ते पाषाणात कोरलेल्या शेंदूरचर्चित
गणपतीचे.नेहमी पेक्षा वेगळे असे हे त्रिमितीय शिल्प ( मराठीत सांगायचे झाले तर 3D ) भासते. शेजारी रिद्धी
सिद्धी किंवा दासी असाव्यात त्यांतील डाव्या बाजूच्या स्त्री च्या हातास धरलेला एक
बालक दिसतो, मूर्ती अठराव्या शतकाच्या सुरुवातीची असावी, बरोबर पायरी खाली एक
पाण्याचा स्त्रोत वजा खड्डा दिसतो विशेष म्हणजे तो उन्हाळ्यातही आटत नाही.
इथूनच
पुढे दरीत दोनचार ठीकाणी मस्त रानफुले होती सुरजने ती लीलया कॅमेऱ्यात कैद
केलीत.अजून तसे कोवळे ऊनच होते तसेच माझे आधी एकदा इथे येणे झाले होते पण सुरज व
निखिलला फार उत्सुकता होती.गर्द झाडीतून वाट काढित समोर दिसले ते बांधीव
विश्वेश्वर तळे त्याच्या निर्मळ पाण्यातील छोटी कमळे (water lilly). इथूनच शिल्प सफरीला सुरुवात होते छोट्या मोठ्या शिवपिंडी जागोजागी आहेत,अगदी
भिंतींच्या कोनाड्यात सुद्धा ! एक लहान विष्णु मूर्ती आहे अगदी रेखीव, तसेच दगडी
पायऱ्या सुद्धा अगदी उत्तम स्थितीत आहेत. मग समोर दिसते ते मुख्य देवालय, चारी
बाजूनी भक्कम तटबंदी असलेले द्वारा शेजारीच दिसते ती महाकाय शिवपिंडी अंधाऱ्या
खोली वजा देवळात हनुमंत आहे, त्याच्याच बाजूला झाडाखाली विष्णू वाहन गरुडाचे
शिल्प, हे सर्व पाहताना मनुष्य तिथे रेंगाळतोच, देवालयाचे वर्णन वर दिलेलेच आहे.
मला तिथेच लागलेला एक शोध म्हणजे शिवालयात दारात केलेली कुजबूज अगदी गाभाऱ्यात
शिवलिंगा जवळ स्पष्ट ऐकू येते, मग आम्ही दारातच बसुन स्तोत्र पठण केले त्याचा नाद
आणि कंप गाभारा भरून राहिला... आपण उच्चारलेले एक एक अक्षर श्री पाटेश्वर महादेव अंधाऱ्या गाभाऱ्यात शांभवी
मुद्रेत आसनस्थ होऊन ऐकत आहेत असंच बराच वेंळ वाटत होत. दुपारच्या उन्हात अगदी
ए.सी. लावल्या सारखा गारवा होता, प्रचंड दगडी शिळामधून उष्णता कशी काय प्रवास
करणार ?
मंदिराच्या आवारात अठरा हातांची महिषासुरमर्दिनी देवीची दुर्मिळ मूर्ती आहे.
समोर एक चार मुखांची हाती जपमाळ व रुद्राक्ष धारण केलेली मूर्ती दिसली स्थानिक
तिला ब्रह्मदेव म्हणून सांगतात पण सूक्ष्म निरीक्षण केल्यावर कळते कि, तो
चतुर्मुखी शिव आहे कारण प्रत्येक मुख हे त्रिनेत्र आहे. हातात त्रिशूळ व धनुष्य
आहे, दंडात नाग बंध आहेत आणि गळाभर रुद्राक्ष माळा धारण केलेली शिवामुर्तीच असावी
यावरून सुरज आणि माझी चर्चा चालली होती. वरच्या बाजूस कार्तिक स्वामी मंदिर आहे ते
बघण्यास गेलो. एक प्रशस्त कुरण आहे ज्यात स्थानिक गुरे (बहुतेक खिल्लार जातीची
होती) मोकाट वावरत होती.छोट्याशा देवळात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे वरच्या
बाजूस जास्त फिरत बसलो नाही कारण मुख्य आकर्षण होते मंदिर समूह.
पुढची वाटचाल तिथेच केली, आता
मुर्त्यांबद्दल जास्त सांगणार नाही कारण मग लेखाची लांबी वाढेल. हा मंदिर समूह तीन
भागात विभागाला आहे इथूनच एक गूढ वातावरण निर्मिती होते वेगळ्या आकाराची अनेक छोटी
मोठी शिवलिंगे तसेच शिवालीन्गांवर कोरलेली अक्षरशः हजारो शिवलिंगे आहेत अंधारी भय
उत्पन्न करणारी गर्भगृहे आणि त्यांतील असंख्य मुर्त्या त्यांचे कोरीवकाम,घोटीवकाम
आपल्याला नि:शब्द कधी करते कळतही नाही. एके ठिकाणी अतिशय दुर्मिळ असे अग्निवृषाचे
शिल्प आहे ज्याचे ऋग्वेदात वर्णन आहे ज्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील.
अग्नीला चार शिन्गे, तीन पाय, दोन मस्तके, सात हात असून त्यास अटोकयात
ठेवण्यासाठी तीन ठिकाणी बांधावे लागले आहे. लोकाना माहिती
नसल्याने व तसा एकही फलक कुठे नसल्याने नवखा मनुष्य बुचकळ्यात पडल्या शिवाय राहणार
नाही. कोणाला हि सहज पडतील असे प्रश्न म्हणजे या मंदिरांचे व अश्या असंख्य गूढ
मुर्त्यांचे प्रयोजन काय? मला वाटते कोणे एकेकाळी येथे तंत्र उपासना होत असावी,
गूढ कर्मकांडे होत असावी त्यामुळे आजही इथे गूढता भारून राहिली आहे संपूर्ण परिसर
शिव शाक्त तत्वांनी भारलेला भासत राहतो, कधी वाटते इथे शिल्प शाळा असावी, अज्ञात
शिल्पकार इथे शिल्प साधना करीत असावेत त्यांच्या कल्पना शक्तीतून मेहनतीतून
साकारलेली हि शिल्प आहेत त्याचा प्रत्यय पावलो पावली येत राहतो मुख्य म्हणजे आजही
हि शिल्पे सुस्थितीत आहेत तसेच स्वच्छता देखील त्या मानाने बरी आहे इतर
लेण्यांसारखा मनुष्याचा प्रादुर्भाव त्यांना झालेला नाही तसेच मूर्ती भंजकांची
वक्रदृष्टी पडलेली नाही त्यामुळे हा दुर्मिळ ठेवा आपल्यास पहावयास तरी मिळतोय हेच
आपले भाग्य. प्रत्येक मूर्ती दुसरी पेक्षा वेगळी, काही देवता वेदांमध्ये वर्णन
केल्या प्रमाणे शिल्पबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय मंदिरांभोवती चौबाजुनी फिरलो
अजून खूप काही पहायचे राहुन गेलेय अभ्यासायचे राहुन गेलेय असे वाटत होते पण पुन्हा
पुन्हा यावेच लागेल याची खात्री आहे. प्रत्येक मूर्ती मागे तिचा तिच्या
मुर्तीकाराचा एक अज्ञात इतिहास आहे जो आपल्यास कधीही कळू शकणार नाही. आपल्या
साताऱ्यात अशा प्रकारचे ठिकाण आहे याचा सार्थ अभिमान आहे. आम्ही आलो तेंव्हा
महाविद्यालयीन मुला मुलींचा घोळका इकडून तिकडे फिरत होता जागेचं वास्तुच सौंदर्य
पहाण्या ऐवजी बाहेर असणाऱ्या गरुड आणि इतर देवतांच्या मूर्ती बरोबर सेल्फी घेत
शांततेचा भंग करण्यासाठी विचित्र आवाज काढणे निरर्थक हाका मारणे वगैरे नेहमी दिसणारे
प्रकार चालू होते.
कधी कधी भीती वाटते या असल्या प्रकाराची
वाटते ही असली दुर्मिळ ठिकाण लोकांच्या माहिती पासुन दूरच राहिलेली बरी कारण मग
त्यांचा वनडे पिकनिक स्पॉट व बाजारीकरण व्हायला वेळ लागत नाही.असो पण पाटेश्वर
म्हणजे काहीतरी गूढ कोडे आहे इतके नक्की. इथे सदगुरू गोविंदानंद सरस्वती महाराज
यांचा समाधी मठ आहे तसेच काही कुटुंबे वस्तीला देखील आहेत. येणाऱ्या यात्रेकरूंची
इथे पिण्याच्या पाण्याची व दुपारच्या भोजनाची सोय नि:शुल्क केली जाते, केवळ रात्री
मुक्काम करण्यास परवानगी नाही.सर्वात महत्वाचे म्हणजे मोबाईलला रेंज आहे !
परतीच्या प्रवासात आपण कधी खाली पोहोचतो ते आपणाला कळत देखील नाही, मागे वळून
पाहिल्यास पाटेश्वर चे देवालय दिसत नाही किंवा लेणी दिसत नाही. सगळे कसे गडप
झाल्या सारखे वाटत राहते, थोड्याच वेळात आपण सातारा शहरात प्रवेश करतो आणि तिथल्या
वाहतुकीच्या स्पर्धेत हरवून जातो आणि मनात वाटत राहते युगायुगांचा समाधीमग्न योगी,भस्मचर्चित शांभवी मुद्रेतील
जटाधर श्री पाटेश्वर सपरिवार पर्वतावर एकाकी आहे .......
- अमित खरात ( 9764706877 )









वरील लेख खरचं खूप छान आहेत, पाटेश्वर दौऱ्या बद्दल वाचताना परिसर डोळ्यासमोर उभा रहातो, तेथे जाऊन प्रत्यक्ष परिसर पाहण्याची उत्सुकता दाटुन येते. हा लेख लिहिल्याबद्दल आणि आपल्या सातारच्या जवळच अशीही ठिकाणं आहेत हे सांगितल्याबद्दल आभारी आहे, तुमचा ह्या ब्लॉग साठी शुभेच्छा, - स्वामी
ReplyDelete