किकली (सातारा) येथील शिवालय
सातारा जिल्हा जसा निसर्गरम्य पर्यटन स्थळांनी नटलाय तसाच तो आपल्या खांद्यावर अनेक गिरिदुर्ग देखील मिरवतो आणि अनेक तीर्थक्षेत्रे प्राचीन देवालये सुद्धा ! असेच एक देवालय पाहण्यात आले, आमच्या शिल्प अभ्यास दौऱ्यानिमित्त केलेल्या पाटेश्वर येथील भटकंती नंतर .....
पाटेश्वर वरून येताना चतुर्बेट येथील बारा मोटेची विहीर लागते ती आता सर्वांच्या चांगल्याच परिचयाची झालेली आहे शनिवारी,रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी बरेच पर्यटक नियमितपणे त्या देखण्या शिल्प वैभवाला भेट देत असतात. त्याबद्दल इंटरनेट वर बरीच माहिती उपलब्ध आहे म्हणून मुद्दाम इथे सांगत नाहिए बहुतेक पुन्हा कधीतरी नक्की त्याविषयी लिहीन.तर हि बारा मोटेची ऐतिहासिक विहीर पाहून आम्ही आड बाजूने किकली गावाकडे प्रस्थान ठेवले GPS ऑन केले व निघालो आम्ही, पण इथून कशासाठी आलो असे झाले.. रस्ता उरकतच नव्हता बराच वेळ एका निर्जन अरुंद वाटे वरून चाललो होतो पण त्यात देखील दुतर्फा मस्त हिरवीगार शेती व स्वच्छ पाण्याचे पाट वाहत होते त्यामुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता सुरज आणी निखिलची मजा मस्ती चालली होती. वाटेत लिंब गोवे गावाजवळ कृष्णेवर साधा पुलं आहे तिथे हातपाय धुण्याची आमची इच्छां झाली. स्वच्छ खळाळता नदीचा प्रवाह गाडी पार्किंग ला लावून समोर दिसणाऱ्या कोटेश्वर मंदिरात उतरलो तर समोर छोटेखानी घाट बांधलेला दिसला.
भव्य द्वार पाहून क्षणभर नरसोबाच्या वाडीची लघु प्रतिकृतीच असल्या सारखे भासले दुपार सरत चालली होती आणि अशा वेळी खळाळता अवखळ प्रवाह समोर दिसत होता कधी कधी पाण्याचा आवाज देखील आपल्याला मोहून टाकतो तसेच त्याच्या केवळ दर्शनानेच थकवा दुर पळतो, सुरज आणि निखील बघता बघता मोकाट सुटले आणि पाण्यात शिरले प्रवाहात एक मध्यम आकाराचा एक नंदी गळया पर्यंत बुडाला होता ते दृश्य अद्भूत होते.पाणी वाहत असल्यामुळे दगडी फरशीवर शेवाळे अजिबात नव्हते, मग पाय सोडून बराच वेळ आम्ही गप्पा मारीत बसलो, मंदिरात पूजा चालू होती त्या मंगलमय वातावरणात दर्शन घेऊन आम्ही किकली कडे जाण्यास निघालो तत्पूर्वी एक मंदिराला एक प्रदक्षिणा घातली तेंव्हा तिथे एक विरगळ व सतीशिळा दिसली, अश्या शिळा दिसल्या कि मन इतिहासात रमते, त्यांचा अर्थ सुरजने विचारलाच मग थोडे स्पष्टीकरण देऊन आम्ही पुढे निघालो मंदिर पेशवे कालीन आहे, लक्षात राहतो तो बाहेरील देवळीत स्थापलेला संगमरवरी गणपती आणि त्याची उत्तर पेशवे कालीन छाप लगेच दिसून येते प्रभादेवीच्या सिद्धीविनायाका सारखी ठेवण आहे. तीर्थ प्रसाद घेऊन निघालोच किकलीला शोधत.
गावात प्रवेश करताच समोर दिसल्या त्या असंख्य वीरगळी, झाडाला टेकून उभ्या केलेल्या तर दारालगत,दुकानाच्या बाहेर, नळा शेजारी अक्षरशः शेकडो.. प्रत्येकीची ठेवण थोडीफार सारखी असली तरी त्यांतील कथा वेगळी आहे, ती आहेत मातीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची स्मारकं. त्यांनी गाजवलेल्या शौर्याच्या त्यांच्या परिवाराने शिल्पबद्ध करण्याचा प्रयत्न केलेल्या आठवणी. डोळ्यांचे अक्षरशः पारणे फिटते, अभ्यासकांनी आवर्जून यावे अशी जागा पण पुन्हा एकदा प्रश्न पडतो आपल्या इतिहासाबद्दल अजून किती उदासीन राहणार आहोत आपण ? इथे कधी काळी शिलाहार व यादव यांच्यात संघर्ष झाला होता असे समजते या शौर्य भूमीला व अज्ञात वीरांना मनोमन नतमस्तक होऊन पुढे सरसावलो.. मग थोड्याच अंतरावर श्री भैरवनाथ मंदिर दृष्टीपथात आले. पंधरा सोळा पायऱ्या चढून गेल्यावर समोर भव्य प्रवेश द्वार दिसले आत पहारेकर्यांच्या भव्य देवड्या होत्या आणि समोर दिसले ते भव्य प्राचीन देवालय असे वाटले दोन्ही बाहू पसरून ते आम्हास जवळ बोलावत आहे...
आपल्या उजव्या हाताच्या बाजूला दोन अपूर्णावस्थेतील ( कि उध्वस्त? ) कोरीव अलंकाराने नटलेली देवालये. उल्लेखनीय आहे तो गणेश वंदना स्तंभ व त्यावर कोरलेले वादक. त्याच्या शेजारीच छत नसलेला केवळ मंदिराचा चौथराच दिसतो.मग आम्ही मुख्य मंदिराकडे वळलो मुखमंडप, प्रवेशद्वार, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी एकंदर रचना दिसते.मुखमंडपाच्या सुरुवातीलाच दिसतात ते असंख्य प्रकारचे व्याल त्यांतील काहीप्रकार तर प्रथमच पाहण्यात आले मेष व्याल, वृषभ व्याल, अश्व व्याल, शुक व्याल, गर्दभ व्याल, वराह व्याल,व्याघ्र व्याल तसेच काही मैथुन शिल्पे, गरुड आणि व्याल पट्टीका, पुढे मुखमंडपातच प्रशस्त नंदी दिसतो त्यानंतर प्रवेश द्वारावरील शिल्पांची गर्दी आपल्याला निश्च्छित पणे खिळवूनच ठेवते अतिशय सुबक कोरीव शिल्पे जशी काही साचेबद्धच असावीत अशी, त्यात भैरव आहे शिवगण आहेत, प्रतिहारी, सूरसुंदरी, द्वारपाल आणि त्यांचे सुबक अलंकार पहातच राहावे असे उंबऱ्या भोवतालचे नक्षीकाम अवर्णनीय... किती लिहावे तितके कमीच, आपण हे सर्व पाहण्यास प्रत्यक्षच यावयास हवे सभामंडपातील शोभा तर अजूनच निराळी. हेमाडपंथी तुला साधन करून तोललेले नक्षीदार खांब प्रत्येक खांब निराळा, त्यावर कोरलेले रामायण महाभारतातले प्रसंग आज इतक्या वर्षांनी देखील जिवंत वाटतात हेच याचे वैशिष्ठ्य. आत समोर शिवलिंग आहे व आपल्या उजव्या बाजूच्या गाभाऱ्यात श्री भैरवनाथ स्थापित आहेत मला वाटते हे मूळ मंदिर शिवालयाच आहे मुख्य देवता हि महादेवच असावी पुढे ग्रामस्थांनी त्यास भैरवनाथ मंदिर असे नामकरण केलेले दिसते, असो पण अंतराळात प्रवेश करताच देवतेचे चैतन्य लगेच जाणवते व नकळत आपण नतमस्तक होतो.
मंदिर त्रिदला कार आहे सभामन्डपातून तीन गाभारे तीन दिशेला आहेत. देवाची पूजा आणि नैमित्तिक कर्मे चालू असल्यामुळे मंगलमय वातावरण होते स्वच्छता सुद्धा उठून दिसत होती. मी तिथे उपस्थित पुजार्यांशी व काही ग्रामस्थांशी नेहमी प्रमाणे संवाद साधला आपल्या भागात साधारणपणे भैरवनाथाच्या सोबत त्याची शक्ती श्री जोगेश्वरी असते पण इथे ती दिसत नाही म्हणून हा बटूक भैरव आहे कां म्हणून मी विचारणा केली तेंव्हा त्यांनी आस्थेने सांगण्यास सुरुवात केली. तसेच मला मंदिराच्या प्रत्येक शिळेवर पांढर्या अक्षरात क्रमांक टाकलेले दिसले तेंव्हा ग्रामस्थांनी सांगितले सदर देवालय जीर्ण झाले होते जवळपास भग्नच होण्याच्या वाटेवर होते पण चार वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्व खात्याने त्याचा ताबा घेऊन सुमारे चार कोटी रुपये खर्च करून हे देवालय पूर्ण पणे खाली उतरविले व पुन्हा आहे तसे उभे केले, जीर्ण झालेल्या शिळा बदली केल्या, थोडी डागडुजी केली हेमाडपंथी बांधणीत चुन्याचा वापर होत नसल्याने हे कार्य शक्य झाले म्हणून प्रत्येक शिळेवर हे क्रमांक टाकले आहेत व त्यामुळे मंदिर इतके सुस्थितीत ठेवले आहे. नाहीतर आता पर्यंत ते रंगीबेरंगी नक्कीच झाले असते.
आजही त्याची देखभाल गावकरी व पुरातत्व खाते जबाबदारीने करतात त्यांच्या प्रयत्नानेच हा ठेवा आज आपल्याला पाहता येतो. मंदिराच्या बाहेरील बाजूस कोणतेही शिल्पकाम नाही तसेच वर शिखर सुद्धा नाही. महाराष्ट्रातील अनेक देवळापैकी भूमिज शैलीतील हे हेमाडपंथी मंदीर. परतीच्या वाटेवर जाताना मुख्य द्वारा पाशी पोहोचलो तर समोर चंदन, वंदन हे दोन देखणे गिरिदुर्ग एकमेकांच्या सोबतीने उभे दिसतात आपण ते दृश्य पाहून पुन्हा देवालयाकडे नकळत कटाक्ष टाकतोच.
आपल्याच आजूबाजूला इतकी सुंदर प्राचिन शिल्प सौंदर्याने समृद्ध देवालये आहेत याची कधी कधी आपल्याला जाणीव देखील नसते. खरच आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आणि हो, इथल्या पंचक्रोशीत श्री भैरवनाथाची यात्रा फार प्रसिद्ध आहे दसऱ्या नंतर येणाऱ्या पहिल्या शनिवार रविवारी हि यात्रा भरते त्यात गावाची एकी दिसून येते विशेष म्हणजे यात्रेत देवाचा छबिना इथे दिवसा भरतो. असा अठरा पगड जाती जमातीच्या लोकदेवतेच्या प्राचीन देवालयाला नक्की भेट द्या !!
- अमित खरात ( 9764706877 )
छायाचित्र साभार : सुरज कळंबे, इंटरनेट
















Comments
Post a Comment