बिल्व वृक्षाच्या शोधात
हजारो वर्षांची प्राचिन संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात पर्यावरण,समाजजीवन,जीवसृष्टी यासंबंधी इतकी विविधता आहे कि,जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही नसेल. आपली संस्कृती आपले सण,उत्सव,देवता व त्यांच्या पूजा पद्धती यासर्व निसर्गाच्या ऋतूचक्रावर आधारित आहे,या पूजा पद्धतीमध्ये लागणाऱ्या वनस्पती व पत्री देखील इतक्या बारकाईने अभ्यासपूर्वक त्या त्या देवतेच्या तत्वा विषयी ठरवून दिलेल्या आहेत कि आश्चर्य वाटते.मग ती विष्णूची तुळस असेल किंवा गणपतीची दुर्वा किंवा एकवीस पत्री.या सर्वांपासुन थोडी निराळी अशी प्राचिन देवता आहे शिव.
    ज्याच्या पूजेत अवडंबर असे काहीच नसते अगदी साध्या साध्या गोष्टीउदा.भस्म,जल,चंदन,अक्षता व सर्वात महत्वाचे म्हणजे बेलाचे पान,या त्रिदल पत्रामुळे तो आपल्या भक्तावर प्रसन्न होतो.म्ह्णूनच म्हटले आहे “ त्रिदलं त्रिगुणाकार त्रिनेत्र च त्रिधायुतम I त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्र शिवार्पणम II ” हा आदिनाथ म्हणजे युगा युगांचा योगी ज्याचे वास्तव्य गाव कुसा पासून दूर कुठेतरी अरण्यात किंवा नदीकाठी स्मशानात,त्याचे देवालयही असेच आडबाजूला असते जिथे कुणी सहसा येत जात नाही अशा ठिकाणी याचे वास्तव्य. अठरा पगड जातींचा, उच्चवर्णीयांचा तसेच शुद्रातीशुद्रांचा हा देव. त्याच्या देवळाबाहेर एक पाय दुमडून मांडी घालून बसलेला दगडी नंदी, उंबरठ्याखाली भेसूर कीर्तिमुख,गाभारासुद्धा अंधाराने भरलेला जमिनीपासून खाली, तिथे लिंगरूपात महाराज बसलेले, डोक्यावर तांब्याची किंवा पितळी चकाकणारी नाग फणी कधीकधी लिंगावर पितळी भरदार मिशा असलेला मुखवटा वर पाण्याने भरलेले अभिषेक पात्र त्यातून खाली पडणारी जलधारा व शेजारी मिणमिणता नंदादीप, मागील कोनाड्यात पार्वतीची मूर्ती, असे चित्र देशातील बहुतेक गावात जवळ जवळ सारखेच आहे हेच त्याचे स्वरूप, पण तरीही लोकमानसात अतिशय पूजनीय असा.
      आमच्या येथील परिसरात बिल्वपत्रे सहसा उपलब्धच नसतात कारण मुंबई पुण्यासारखी फुलांची बाजारपेठ येथे नाही. त्यामुळे शिव पूजेसाठी आपल्यालाच त्याची सोय करावी लागते. झाडे आहेत ती सुद्धा अतिशय तुरळक जवळ जवळ नाहीतच. नर्सरीत सुद्धा मिळत नाहीत, असेच एकदा बोलता बोलता सुरज जवळ ह्या वृक्षांचा विषय निघाला तेंव्हा तो म्हणाला कि त्याच्या गावी म्हणजे कुसागावाच्या रानात बेलाची दोन तीन झाडे होती पण त्याला वाळवी लागुन एव्हाना ती नष्ट झाली असतील. पण माझे मन हे मान्य करीत नव्हते एकतर हा वृक्ष तसा दुर्मिळ आणि तो सुद्धा रानात नैसर्गिकरीत्या वाढलेला पहावयास मिळणे म्हणजे एक  नवल होत. असेच दोन तीन दिवस गेले मला स्वस्थ बसवेना मग आमच ठरलं रविवारी दुपारी जाण्याच नक्की झाल. मी या आधी कुसगावाला कधीच गेलो नव्हतो म्हणून वाई स्थानका जवळ तो मला घ्यायला आला मग बाईक वरून निघालो गावातून विठ्ठलवाडी म्हणजे अर्ध्या रस्त्या पर्यंत बाईक जाते तिथून पुढे पायवाट लागली, सोबत सुरज चा विष्णू दादा सोबतीला होता.



   वाटेत गवत उंच वाढल्याने पायाखाली जेमेतेम दिसत होते, थोडीफार चढण होती पण आजूबाजूला विस्तीर्ण पसरलेली छोटी छोटी कुरण आणि तुरळक चाललेली शेतीची कामे, पायाजवळून खळाळत चालणारे पाण्याचे प्रवाह व पिवळी फुलपाखरे एकदम चित्रातल्या सारखे दृष्य दिसत होते. मग विष्णू दादाने लांबवर इशारा करून एका दरीत ती झाडे असल्याचे सांगितले. एव्हाना आम्ही बराच पल्ला गाठला होता वाटत होते जसा शंभू महादेव या लोकवस्ती पासून दूर अगदी तसाच त्याचा प्रिय बिल्व वृक्षही एकाकी निर्जन स्थळी, आमची उत्सुकता वाढत चालली होती. भरदुपारी सुद्धा जिथे सूर्यकिरणे जेमेतेम पडतील अशा निबिड रानात आम्ही प्रवेश केला, जसजसे जवळ जात होतो तसा ओढ्याचा खळाळता आवाज स्पष्ट येकू येऊ लागला,थोडी अजून चढण चढल्या नंतर आम्ही त्या स्थळी येऊन पोहोचलो.
      सुरज म्हणाला ते पहा वृक्ष.... पण वृक्ष होतेच कुठे? एक वृक्ष पूर्णपणे वाळला होता तर दुसरा अगदी जीर्ण होऊन कसाबसा तग धरून होता पण तरीही त्याच्या अंगा खांद्यावर चिमुकली कोवळी पाने दिसत होती त्यावरूनच त्याची जगण्याची आस व धडपड दिसून आली. आजूबाजूच्या झाडाझुडपानी अरेरावी करत त्या वृक्षराजाचे अस्तित्वच झाकोळून टाकले होते. त्याच्या खोडावर निळसर रंगाची भस्मा सारखी पूड निघत होती, पण काहींही म्हणा तिथे गेल्यानंतर एखाद्या शिवालयात आल्याचा भाव दाटून येत होता, आम्हाला इथवर आणण हि कदाचित त्या शंकराचीच लीला असावी. मग आम्ही ठरवलं परिसर साफ करून मोकळा करायचा त्या आधी अजून कुठे छोटी झाडे आहेत का? ते पाहणे गरजेचे होते. थोडी शोधा शोध केल्यावर अजून एक चिमुकला बिल्व वृक्ष सापडला त्यावरील वेली काढून टाकल्या, मोठ्या वृक्षा शेजारील करंज वृक्षाच्या फांद्या आम्हाला नाईलाजाने तोडाव्या लागल्या तेंव्हा कुठे तो मोकळा झाला त्याच्या शेंड्यावरील पालवी स्पष्ट दिसली, मग खोडाची वाळवी झटकून टाकली थोडी मातीची भर घातली तेवढ्यात अजून एक अगदी चिमुकले नैसर्गिकरीत्या वाढलेले एक बेलाचे रोपटे दिसले... थोडी साशंकता होती, पण नक्की ते त्याचेच रोपटे होते आता विचार केला याला बरोबर घेऊन जाऊ व शिवाचा प्रसाद म्हणून त्याचे संगोपन करू, सुरजला सांगितले हे रोपटे सध्या कुंडित लाव व यथावकाश जमिनीत.




      बराचवेळ आम्ही अगदी झपाटल्या सारखी कामे करीत होतो हे सर्व करीत असताना एकमेकांशी बोलत देखील नव्हतो. सगळे मनासारखे झाल्यावर मग तिथून निघालो, पण जाताना मनापासून त्या प्राचिन वृक्षाला मनोभावे नमस्कार केला. मनात एक विचार सतत येत होता हे झाड म्हणजे औषधी गुणधर्मानी परिपूर्ण, तसेच नैसर्गिकरित्याच एकाकी दुर निर्जन स्थळी अगदी संथ गतीने वाढणारे, कदाचित म्हणूनच याला शिवपूजेत अग्रक्रम दिला असावा जेणेकरून हि दुर्मिळ प्रजाती नष्ट होऊ नये व तिची गरज माणसाला नेहमीच लागावी व तिचे नकळत संवर्धन व्हावे. कारण काहीही असो पण हा दुर्मिळ ठेवा आपल्याला जतन करावाच लागेल. त्यासाठी जास्तीत जास्त बेलाची रोपटी योग्य माणसांना भेट देण्याचा संकल्प केलाय व त्या दृष्टीने प्रयत्न चालू केलेत त्यात नक्कीच यश येईल. कदाचित आम्ही बिल्व वृक्षाच्या शोधात गेलो नसतो तर पुढच्या वर्षी त्याचे अस्तित्व देखील संपून गेले असते व असा अविस्मरणीय अनुभव आम्हाला मिळालाच नसता.
-- अमित खरात ( ९७६४७०६८७७ )

Comments

Popular posts from this blog